CISCE रिदमिक जिम्नॅस्टिक राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. ठाणे जिल्ह्यातल्या ऐरोलीमधल्या आर्य क्रीडा मंडळ इथं पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या परिना मदनपौत्रा हिने सुवर्ण कामगिरी केली. 17 वर्षाखालील गटात खेळताना परिना मदनपौत्राने तब्बल 7 पदकांची लयलूट केली. यात 5 सूवर्ण आणि दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. रिदमिक जिम्नॅस्टिक खेळाच्या चारही प्रकारात परिनाचंच वर्चस्व पहिला मिळालं.
ऑलराऊंड गटात सुवर्णपदक, हुप प्रकारात सुवर्णपदक, बॉल प्रकारात सुवर्णपदक, क्लब्स प्रकारात रौप्य पदक, रिबन प्रकारात रौप्य पदक आणि टीम चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्र संघाचं सुवर्णपदक अशा पदकांची तीने कमाई केली.
रिदमिक जिन्मॅस्टिकच्या आंतरराष्ट्रीय कोच आणि प्रशिक्षक वर्षा उपाध्ये यांच्या प्रिमिअर रिदमिक जिन्मॅस्टिक अकॅडमिची खेळाडू असलेल्या परिना मदनपौत्रा हिने या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली होती. दिवसातले आठ तास ती स्पर्धेसाठी सराव करत होती. या मेहनतीचं फळ अखेर तिला मिळालं. प्रशिक्षक क्षिप्रा जोशी, सदीच्छा कुलकर्णी, जान्हवी वर्तक आणि निरजा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली परिनाने रिदमिक जिन्मॅस्टिकचे धडे गिरवले.
26 ऑक्टोबर 2008 साली जन्मनलेल्या परिनाला वयाच्या पाचव्या वर्षापासूनच रिदमिक जिन्मॅस्टिक खेळाची आवड निर्माण झाली. आंतराष्ट्रीय कोच आणि प्रशिक्षक वर्षा उपाध्ये यांच्या अकॅडमीत शिकण्याची तिला संधी मिळाली आणि या संधीचं परिनाने सोनं केलं. आपल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीतने परिनाने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तब्बल 37 सुवर्णपदकं, 19 रौप्य पदकं आणि 14 कांस्य पदकांची कमाई केली आहे. राज्याबरोबरच तिने देश आणि परदेशातही अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. नुकत्याच थायलंड इथं झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत परिनाने भारताचं प्रतिनिधित्व केलं.
रिदमिक जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारचा महाराष्ट्रात प्रसार करण्याचं श्रेय जातं ते वर्षा उपाध्ये यांना. गेली अनेक वर्ष या खेळासाठी झटणाऱ्या वर्षा उपाध्ये यांनी अनेक खेळाडू घडवले. त्यांनी स्थापन केलेल्या प्रिमिअर रिदमिक जिम्नॅस्टिक अकॅडमीच्या आज राज्यभर विविध शाखा असून हजारो मुली त्या अकॅडमीत प्रशिक्षण घेतात. या अकॅडमीतल्या अनेक मुलींनी राष्ट्रीय तसंच आंतराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे.