बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने 200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा अंतरिम जामीन मंगळवार, 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. त्या दिवशी नियमित जामीनावरती आदेश सुनावण्यात येणार आहे. पटियाला हाऊस कोर्टाच्या या निर्णयानंतर जॅकलिन फर्नांडिसला सुमारे चार दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळाला आहे. दुसरीकडे, जॅकलीन फर्नांडिसचा जामीन रद्द करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी सातत्याने न्यायालयात युक्तिवाद करत आहे.
गुरुवारी पटियाला हाऊस कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने जॅकलिन फर्नांडिसच्या जामिनाला कडाडून विरोध केला. मनी लाँड्रिंगशी संबंधित सर्व आरोपी तुरुंगात असताना जॅकलिन फर्नांडिसला जामीन का द्यावा, असा युक्तिवाद अंमलबजावणी संचालनालयाने केला. अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्री जॅकलिनच्या जामीन अर्जाला विरोध केला असून, तिने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तपासात सहकार्य केले नाही अशा परिस्थितीत अभिनेत्रीला जामीन मिळू नये असे ईडीचे म्हणणे आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. त्याच्यावर महाठग सुकेश चंद्रशेखरकडून करोडोंच्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. सुकेशला आधी नोरा फतेहीसोबत लग्न करायचे होते असे सांगितले जात आहे. पण नंतर सुकेशचे जॅकलिन फर्नांडिससोबतचे नाते अधिक घट्ट झाले. जॅकलीन फर्नांडिसच्या वकिलाने सांगितले की, अभिनेत्री निर्दोष असल्याने मी त्यासाठी लढा देत राहणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या चंद्रशेखरनेही या प्रकरणात अभिनेत्रीचा काहीही संबंध नसल्याचा दावा करणारे पत्र लिहिले आहे.