इंडोनेशियाने G20 चे अध्यक्षपद भारताकडे सोपवले असून, G20 ची बाली शिखर परिषद आज दुसऱ्या दिवशी संपली. आता पुढील वर्षी होणाऱ्या परिषदेचे अध्यक्षपद भारत भूषवेल. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “G-20 चे अध्यक्षपद भूषवणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही आमच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये बैठका घेणार आहोत. आमच्या पाहुण्यांना भारताच्या अद्भुततेची, विविधता, सर्वसमावेशक परंपरांची ओळख करून दिली जाईल. सांस्कृतिक समृद्धीचा पूर्ण अनुभव मिळेल.
यासोबतच महिलांच्या सहभागाशिवाय जगाचा विकास शक्य नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आमच्या G-20 अजेंड्यातही आम्हाला महिला नेतृत्वाला प्राधान्य द्यावे लागेल. यासोबत ते म्हणाले की, “मी खात्री देतो की भारताचे G-20 चे अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल, आमचा प्रयत्न असेल की G-20 नवीन कल्पनांच्या संकल्पनेसाठी आणि गट कृतीला गती देण्यासाठी जागतिक प्रमुख प्रवर्तक म्हणून काम करेल.”
जग भौगोलिक-राजकीय तणाव, आर्थिक मंदी, ऊर्जेच्या वाढलेल्या किमती, महामारीचे दुष्परिणाम आणि इतर समस्यांशी झुंजत असताना भारत G-20 ची जबाबदारी घेत आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.