भारतातील कलाकृती ऑस्कर शर्यतीत उतरल्या आहेत. २०२३ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाचहून अधिक भारतीय चित्रपटांना नामांकन मिळाले आहे.
जगभरातील ३०० हून अधिक चित्रपटांची यादी ऑस्करने जाहीर केली ज्यात कन्नड चित्रपट ‘कांतारा’ आणि ‘विक्रांत रोना’, बॉलीवूड चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’, ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ तसेच मराठी चित्रपट ‘मी वसंतराव’ आणि ‘तुझ्यासाठी काही ही’ यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ‘ आर आर आर’ आणि पान नलिनचा ‘छेल्लो शो’ या कलाकृतींचाही यात समावेश आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ९५ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट चित्र’ पुरस्कारासाठी विचारात घेण्यात आला असून, या चित्रपटातील कलाकार पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री / अभिनेता’ पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटरवर दिली आहे.
९५ व्या ऑस्करसाठी अंतिम नामांकनांची घोषणा २४ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार असून, हा सोहळा १२ मार्च रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे.