नवी दिल्लीः २००२च्या गुजरात दंगल प्रकरणात बनावट पुरावे उभे केल्या प्रकरणी अटकेत असलेले माजी आयपीएस अधिकारी आर. बी. श्रीकुमार यांना बुधवारी गुजरात उच्च न्यायालयाने १५ नोव्हेंबरपर्यंत हंगामी जामीन दिला. या आधी सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार तिस्ता सेटलवाड यांना न्यायालयाने जामीन दिला होता. त्यानंतर या प्रकरणातील हा दुसरा हंगामी जामीन आहे.
गेल्या २५ जूनपासून श्रीकुमार हे अटकेत आहेत. त्यांना सध्या १५ हजार रु.च्या जातमुचलक्यावर हंगामी जामीन देण्यात आला आहे. श्रीकुमार यांचे वय व त्यांच्याविरोधात दाखल केलेले आरोपपत्र पाहून जामीन मिळावा अशी मागणी न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने त्यांना हंगामी जामीन मंजूर केला पण त्यांना पासपोर्ट एका आठवड्यात जमा करण्यास सांगितले आहे.
दरम्यान सेटलवाड यांच्या विरोधात एसआयटीने स्थानिक न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राची एक प्रत त्यांच्या वकिलाला द्यावी असे निर्देशही गुजरात उच्च न्यायालयाने स्थानिक न्यायालयाला दिले आहेत.