Sunday, April 21, 2024

इराण हिजाब सक्तीविरोधः पोलिसांच्या गोळीबारात तरुणी ठार

दुनियाइराण हिजाब सक्तीविरोधः पोलिसांच्या गोळीबारात तरुणी ठार

नवी दिल्लीः इराणमध्ये हिजाब सक्तीच्या विरोधात आंदोलन करणाऱी २० वर्षीय तरुणी हदीस नजाफी हिला इराणच्या पोलिसांनी कराज या शहरात ठार मारल्याचे वृत्त आहे. हदीसच्या या मृत्यूमुळे इराणच्या जनतेत संतापाची लाट उसळली असून तिला श्रद्धांजली वाहणारे अनेक व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हदीसच्या फोटोला फुले वाहून तिला साश्रुनयनांनी निरोप दिला जात असल्याचे फोटो व व्हीडिओ मंगळवारी, बुधवारी ट्विटरवर दिसत होते.सोशल मीडियावर हदीसला एकूण सहा गोळ्या मारल्याचे वृत्त पसरले. त्यातील काही गोळ्या चेहरा व मानेला लागल्याचे समजते.गेल्या आठवड्यात हिजाब सक्तीच्या विरोधातला हदीसचा व्हीडिओ टीकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जगभर वेगाने पसरला होता. हदीस हिजाब न घालता सरकारविरोधात निदर्शने करताना दिसून आली होती. हदीसव्यतिरिक्त इराणच्या पोलिसांनी ३२ वर्षीय गझेल चेहलवीसह अन्य दोन महिलांना ठार मारल्याचे वृत्त आहे. गझेलच्या डोक्यात गोळी मारण्यात आली. ती घोषणा देत असताना पोलिसांनी तिला ठार मारले. या व्यतिरिक्त २३ वर्षीय हनाने किवा व १८ वर्षीय महसा मोगोई या दोन तरुणींना इसफहान शहरात निदर्शनात ठार मारण्यात आले आहे.

दरम्यान गेल्या दोन आठवड्यात इराणच्या पोलिसांनी ४१ निदर्शकांना ठार मारल्याचे द गार्डियनचे म्हणणे आहे. हा आकडा अधिकृत आहे पण या पेक्षा अधिक मृत्यू असतील असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles