Thursday, September 19, 2024

काँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज

राजकीयकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकांत लोकसभा खासदार शशी थरूर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार मल्लिकार्जुन खरगे व झारखंडमधील के. एन. त्रिपाठी या तिघांनी शुक्रवारी आपापले नामांकन अर्ज दाखल केले. या निवडणुकांचे मतदान १७ ऑक्टोबरला होऊन निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. काँग्रेसचा नवा अध्यक्ष पक्षाच्या देशाभरातल्या ९,१०० प्रतिनिधींकडून निवडला जाणार आहे.शुक्रवारी या तीन उमेदवारांकडून नामांकन अर्ज भरले जात असताना गांधी कुटुंबियांपैकी एकही सदस्य उपस्थित नव्हता. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत पराभव पत्करल्यानंतर तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देत यापुढे आपण अध्यक्षपद स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. त्यामुळे पक्षाने हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा सोनिया गांधी यांच्याकडे दिली होती.

दरम्यान शुक्रवारी आपला अर्ज दाखल करताना शशी थरूर यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याकडे आपला भर राहील असे स्पष्ट केले. तसेच पक्षातील हायकमांड संस्कृती बदलेन असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रकरणाची तड दिल्लीला पाठवण्याची पक्षाची परंपरा खंडीत करण्याच्या प्रश्नावर थरूर यांनी काँग्रेस अध्यक्ष निर्णय घेईल असा प्रस्ताव नेहमीच मंजूर करता येत नाही. आपण पक्षात विकेंद्रीकरण आणण्याचा प्रयत्न करू, असे मत दिले. आपले विरोधी उमेदवार खरगे हे पक्षाचे पितामह आहेत, त्यांच्याशी लढत मैत्री स्वरुपाची आहे त्यांचा आपण अनादर करत नसून आपला विचार पक्षकार्यकर्त्यांपुढे ठेवत असल्याचे थरूर यांनी स्पष्ट केले.

तर मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आपला नामांकन अर्ज भरला. या नेत्यांमध्ये आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी, भूपेंद्र हुड्डा यांचा समावेश होता. हे नेते पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या जी-२३ गटाचे आहेत. थरूरही जी-२३ गटाचे एक नेते होते.

खरगे यांनी आपण वंचितांच्या प्रश्नांचा संघर्ष कायम ठेवू व काँग्रेस पक्षाची सैद्धांतिक विचारसरणी राजकारणात मांडत जाऊ असे प्रसार माध्यमांना सांगितले.

गुरुवारी उशीरा काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून आपण बाजूला होत असल्याचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी जाहीर केले. दिग्विजय सिंह यांनी खरगे यांना अनुमोदन दिले आहे. दिग्विजय सिंह यांच्या आधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles