युरोझोनचे आर्थिक संकट वाढत आहे. युरोझोनमध्ये येणाऱ्या युरोपातील १९ देशांमध्ये महागाईचा दर प्रथमच दुहेरी अंकावर म्हणजे 10 टक्क्यांवर वर पोहोचला आहे. महागाईमुळे युरोपियन सेंट्रल बँकेवर व्याजदरात वाढ करण्याचा दबाव वाढला आहे.
युरोझोनमधील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती सप्टेंबरमध्ये 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. युरोस्टेटने शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती दिली. 10 टक्के महागाई दर अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात अर्थतज्ज्ञांनी सप्टेंबरमध्ये महागाई दर ९.७ टक्के राहण्याची शक्यता वर्तवली होती. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हा सलग पाचवा महिना आहे की महागाईत वाढ होण्याचा दर अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे.
युरोपीय देशांमध्ये महागाई वाढण्यामागील एक कारण म्हणजे ऊर्जा आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ. युरोपियन देश लिथुआनियामध्ये महागाईचा दर 22.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. चलनवाढीची आकडेवारी समोर आल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष 27 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या युरोपियन सेंट्रल बँकेच्या आगामी बैठकीकडे लागले आहे.
अमेरिका आणि भारतासह जगभरातील केंद्रीय बँका सध्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे प्रमुख व्याजदर वाढवत आहेत. महागाईने उच्चांक गाठल्यानंतर युरोपियन सेंट्रल बँकेवर अशीच दरवाढ स्वीकारण्याचा दबाव वाढला आहे. तज्ञांचा असा अंदाज आहे की, ECB सलग दुसऱ्यांदा व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवू शकते. या वाढीमुळे युरोपीय शेअर बाजारांवर दबाव दिसून येऊ शकतो.
ईसीबी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य मार्टिन कॅजक्स यांनी दरवाढीचे संकेत देत सांगितले, आम्ही महागाई 2 टक्क्यांवर ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि आम्ही त्या लक्ष्यापासून दूर आहोत. मी व्याजदरात 0.75 टक्के वाढ करण्यास पाठिंबा देईन.