काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरुर यांनी असंतुष्ट नेत्यांचा समूह म्हटल्या जाणाऱ्या जी२३ वर चर्चा केली. यावेळी जी२३ बद्दल काही गोष्टी उघड केल्या.
काँग्रेस खासदार शशी थरूर हे सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या प्रचारात व्यग्र आहेत. सोमवारी शशी थरुर यांनी असंतुष्ट नेत्यांचा समूह म्हटल्या जाणाऱ्या जी२३ वर चर्चा केली. यावेळी जी२३ बद्दल काही गोष्टी उघड केल्या. ते म्हणाले की असं काही नव्हतं, हे सगळं माध्यमांनी रचलेलं कथानक आहे. एका गटाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून संघटनेत सुधारणेवर मत मांडलं होतं.
थरूर म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे जी२३ ग्रुप नाही आणि कधी नव्हता. हे सगळं माध्यमातून आलं होतं. माझ्या माहितीनुसार वरिष्ठ नेत्यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि आपल्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं लोकांना बोलावलं होतं. तेव्हा मला फोनवर सांगितलं होतं की शेकडो लोकांनी संपर्क केला आहे जे समर्थन जाहीर करत आहेत. हे तेव्हा झालं जेव्हा कोरोना काळात लॉकडाऊन सुरु होता. त्यावेळी फक्त २३ जण दिल्लीत सही करण्यासाठी होते. त्यामुळे २३ जणांनीच सही केली, अन्यथा ते शेकडो असू शकले असते. त्यापेक्षा जास्त किंवा कमीसुद्धा असते.
ऑगस्ट २०२० मध्ये २३ नेत्यांची सही असलेलं एक पत्र सोनिया गांधींकडे पोहोचलं होतं. त्यामध्ये पक्षात मोठ्या बदलांची मागणी केली होती. या पत्रानंतर राजकीय चर्चा रंगल्या होत्या. कारण बदलाची मागणी करणाऱ्यांमध्ये ५ माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे दिग्गज नेते होते. त्यानंतर या नेत्यांची बैठक झाल्यानंतर राजकीय वातावऱण तापलं होतं.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता ८ ऑक्टोबरला नाव मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. सध्या तरी थरूर विरुद्ध मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात लढत स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे जी २३ गटातील एक असलेल्या शशि थरुर यांना फक्त संदीप दीक्षित यांचेच समर्थन आहे. तर तिवारी, आनंद शर्मा यांच्यासारखे नेते खर्गे यांच्या बाजूने आहेत.