Tuesday, July 23, 2024

हिंदू महासभेचा वादग्रस्त देखावा, महात्मा गांधीजींना दाखवलं राक्षस रुपात

राष्ट्रीयहिंदू महासभेचा वादग्रस्त देखावा, महात्मा गांधीजींना दाखवलं राक्षस रुपात

दुर्गा पुजेत महात्मा गांधी यांच्यासारखा दिसणारा राक्षसाचा पुतळा देखाव्यात ठेवण्यात आला आहे.

अखिल भारतीय हिंदू महासभेने केलेल्या एका देखाव्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. दुर्गा पुजेत महात्मा गांधी यांच्यासारखा दिसणारा राक्षसाचा पुतळा देखाव्यात ठेवण्यात आला आहे. यात राक्षसाच्या रुपात एक धोतर नेसलेला आणि हातात काठी असलेला हा गांधीजींसारखा पुतळा आहे. या पुतळ्याचे आणि महात्मा गांधी यांच्यात साम्य हा योगायोग असल्याचं आयोजकांनी म्हटलंय. तर दुसरीकडे स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांच्या भूमिकेवर टीका करणं गरजेचं असल्याचंही आयोजक म्हणाले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यातील हिंदू महासभेच्या या देखाव्यावर राज्यातील सत्ताधारी टीएमसीसह भाजप, सीपीआयएम, काँग्रेस इत्यादी पक्षांनी टीका केलीय. तर हिंदू महासभेनं यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, “टक्कल पडलेली आणि चष्मा घातलेली व्यक्ती गांधीच असण्याची गरज नाहीय. या देखाव्यात असणाऱ्या राक्षसाच्या पुतळ्याच्या हातात ढाल आहे. गांधीजींकडे कधीच ढाल नव्हती. आम्ही आमच्या देखाव्यात दुर्गा देवीने वध केलेला राक्षस दाखवला आहे. तो राक्षस गांधीजींसारखा दिसणे हा निव्वळ योगायोग आहे.”

तृणमूल काँग्रेसचे महासचिव कुणाल घोष यांनी या देखाव्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. त्यात म्हटलं की, भाजपचा हा खरा चेहरा आहे. बाकी जे भाजप करते ते नाटक आहे. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. गांधीजी आणि त्यांच्या विचारधारेचा आदर जगाकडून कऱण्यात येतो. त्यांचा अशाप्रकारे अपमान सहन केला जाऊ शकत नाही. आम्ही याचा जाहीर निषेध करतो.

सीपीआयएमचे केंद्रीय समितीचे सदस्य समिक लहिरी यांनी म्हटलं की, “भाजप आणि संघाला फक्त भारताचे विभाजन कसं करायचं हेच कळतं, ब्रिटिशविरोधी शक्तींना ते असुर म्हणतात तर दुर्गामातेला ब्रिटिश.” भाजप नेत्यांनीही यावर पक्षाची बाजू स्पष्ट केली. आम्ही अशा गोष्टींना पाठिंबा देत नाही. हे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. प्रशासनाने आयोजकांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप प्रवक्ते समीक भट्टाचार्य यांनी केली.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles