Thursday, September 19, 2024

इंडिगो विमान बॉम्बनं उडवून देण्याची धमकी

महाराष्ट्रइंडिगो विमान बॉम्बनं उडवून देण्याची धमकी

मुंबई विमानतळावरील इंडिगोचं विमान बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर उभं असलेल्या इंडिगोच्या मुंबई-अहमदाबाद विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्यानं मुंबईत खळबळ उडाली आहे. त्यामुळं विमानतळ प्रशासन आणि मुंबई पोलिसांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी संपूर्ण विमानाची तपासणी केल्यानंतर तासाभराच्या उशिरानं विमानानं अहमदाबादसाठी टेक-ऑफ केलं. त्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी मुंबई विमानतळ प्रशासनाला एक ई-मेल प्राप्त झाला. त्यात मुंबईहून अहमदाबादला जाणारं ई-६०४५ या विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथक आणि बॉम्ब शोधक पथक मुंबई विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर खरंच विमानात बॉम्ब ठेवण्यात आलंय का, याची चौकशी करण्यात आली. परंतु विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्यानं विमानाला अहमदाबादला रवाना करण्यात आलं.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला २६/११ सारखा अतिरेकी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई विमानतळावरील इंडिगोचं विमान उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या प्रकरणात मुंबईत पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles