शिवसेनेतील बंडापासून उद्धव ठाकरेंना एकापोठोपाठ एक अनेक धक्के बसले. शिंदे गटाने शिवसेना पक्षासह शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही दावा केल्याने उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देत उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिला. यानंतर आता निवडणूक आयोगानेही उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम दिलं आहे.
उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली बाजू मांडण्यासाठी 5 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतरच निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण चिन्हाचा फैसला होणार आहे.
दरम्यान, 5 तारखेलाच दसरा मेळावा आहे आणि त्याच दिवशी उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्हाबाबत भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.