काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत गौतम अदानींचं नाव तिसऱ्या क्रमांकावर होतं. मात्र, या यादीत अदानींचं नाव खाली घसरलं असून आता ते श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आले आहेत. सोमवारी शेअर बाजारात त्यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याने त्यांना मोठा आर्थिक तोटा झाला आहे.
अदानी समूहाच्या सात कंपन्या स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध आहेत. यात अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट, अदानी विल्मार आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांचा समावेश आहे. अदानींच्या या कंपन्यांचे शेअर घसरल्याने त्यांना एकाच दिवसात 9.67 अब्ज डॉलर अर्थात 78,913 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
अदानी टोटल गॅस लिमिटेडचा शेअर 7.90 टक्क्यांनी घसरून 3,076 रुपयांवर आला तर अदानी विल्मारचा शेअर 717.75 रुपयांवर बंद झाला. अदानी पॉवरचा शेअर 4.00 टक्क्यांनी घसरून 354.85 रुपयांवर आणि अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 8.42 टक्क्यांनी घसरून 3,164.75 रुपयांवर आले. तर अदानी पोर्टच्या शेअरचा भाव 784.95 रुपयांवर बंद झाला आणि अदानी एनर्जीचा शेअर 7.65 टक्क्यांनी घसरून 2,087.85 रुपयांवर आला.
गौतम अदानींच्या शेअर्समध्ये घट असं नाही, तर संपूर्ण बाजारामध्ये ही घट पाहायला मिळाली असल्याचं शेअर इंडिया सिक्योरिटीज लिमिटेड वाइस प्रेसिडेंट आणि रिसर्च हेड रवि सिंह म्हणाले. अमेरिकेप्रमाणे भारतातही व्याजदर वाढले आहेत. त्यामुळे शेअर बाजारावरही सध्या दबाव आहे. नवीन गुंतवणुकदारही गुंतवणूक करायला घाबरत असल्याने शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. शेअर बाजारात मोठी घसरण होत असल्याने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारेही घाबरले आहेत.