हरियाणामध्ये बनवलेल्या चार कफ सिरपवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या कफ सिरपमुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. मुलांच्या मृत्यूनंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही भारतात बनवलेल्या चार सर्दी-खोकलाच्या सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. भारतानेही या संपूर्ण वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सोनीपत, हरियाणा येथील मेडेन फार्मास्युटिकल्स, प्रोमेथाझिन ओरल सोल्युशन, कोफेक्समालिन बेबी कफ सिरप, मेकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप बनवते. या चारही सिरपची गॅम्बियाला निर्यात करण्यात येते. पण डब्ल्यूएचओ च्या म्हणण्यानुसार या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण जास्त असल्याने ते मुलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण मानले जात आहे. या वादानंतर या चार सिरपचे नमुने भारत सरकारने प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. कोलकात्याच्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेतही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा निकाल अद्याप आलेला नाही. निकालाच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळते.
ज्या चार कफ सिरपबद्दल WHO ने अलर्ट जारी केला आहे, ते फक्त निर्यात होतात. ते भारतात वापरले जात नाहीत. आत्तापर्यंत हे सिरप भारतात कुठेही विकले गेलेले नाहीत. हे सिरप फक्त गॅम्बियालाच निर्यात होतात, आरोग्य मंत्रालयाने देखील सध्या WHO चे दावे पूर्णपणे स्वीकारलेले नाहीत. गांबियातील मुलांच्या मृत्यूचे तपशीलवार कारण अद्याप देण्यात आलेले नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. डब्ल्यूएचओ ने अद्याप त्या सिरपचे तपशील सीडीएससीओ ला दिलेले नाहीत
मेडेन कंपनीचे संचालक नरेश कुमार गोयल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांना गुरुवारीच मुलांच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे. सध्या संपूर्ण प्रकरण समजून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही भारतात काहीही विकत नाही. दुसरीकडे, गॅम्बियामध्ये, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जुलैमध्ये एक अलर्ट जारी केला जेव्हा तेथे किडनीच्या समस्येमुळे डझनभर मुले आजारी पडू लागली. काही मुलांचा मृत्यूही झाला होता. आतापर्यंत तेथे 66 मुलांचा मृत्यू झाला आहे. हाच प्रकार या मृत्यूंमध्ये उघड झाला. आणि ही सर्व मुले 5 वर्षांपेक्षा कमी वयाची होती आणि कफ सिरप घेतल्यावर 3 ते 5 दिवसांनी आजारी पडत होती.