दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील राजेंद्र पाल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पाल हे धर्मांतर सोहळ्यात उपस्थित राहिले होते. तेव्हा हिंदू देवदेवतांचा अपमान झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. धर्मांतर सोहळ्यात उपस्थित राहिल्यावरून सुरू झालेला वाद वाढल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
गेल्या आठवड्यात दिल्लीत शेकडो लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी राजेंद्र पाल हे तिथे उपस्थित होते. धम्म दीक्षा घेताना बौद्ध धर्म स्वीकारलेल्या लोकांनी यापुढे आपण हिंदू देवदेवतांची प्रार्थना करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली. यावरून भाजपने पाल यांच्यासह अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. यानंतर पाल यांनी म्हटलं की, भाजप अफवा पसरवत आहे. मात्र या अपप्रचाराने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो.
विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन दिल्लीत केले होते. देशभरात अनेक ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन केलं जातं. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ प्रतिज्ञा घेत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. दरवर्षी बौद्ध धम्माची दीक्षा घेताना या प्रतिज्ञा म्हटल्या जातात. नागपूरमध्येही कार्यक्रमात भारत सरकारचे दोन मंत्री गेले होते. याच प्रतिज्ञांवरून भाजपने आरोप केले असल्याचं राजेंद्र पाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी मला इतकं सहकार्य केलं तरी त्यांना या प्रकरणात ओढण्यात आलं. माझ्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये. केजरीवाल किंवा पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही. मी वैयक्तिक यामध्ये सहभागी झालो होतो. बाबासाहेबांचा सच्चा सैनिक असल्यानं मी प्रतिज्ञा घेतली होती असंही राजेद्र पाल यांनी स्पष्टीकरण दिलं.
राजीनाम्याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री केजरीवाल हे सध्या गुजरातमध्ये रॅलीत आहेत. मी त्यांना राजीनामा पाठवला आहे. दोन पानांच्या पत्रात सर्वकाही लिहिलं आहे. कट्टर देशभक्ती आणि तथागत बुद्धांना मानणारा असून मी विचलित होत नाही. ते लोक जसे त्यांच्या धर्माबद्दल कट्टर आहेत, तसा मी बुद्धांप्रती कट्टर आहे, मी माझ्या इच्छेने राजीनामा दिला आहे.
दिल्लीतील विधानसभेचे विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधूडी यांनी दावा केला की, भाजपच्या दबावामुळे दिल्ली सरकारमधील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांना राजीनामा द्यावा लागला. फक्त राजीमानाच पुरेस नाही, तर हिंदू देवदेवतांच्या अवमाना केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. तसंच पक्षातून हकालपट्टी करायला हवी.