भारतात गेल्या अनेक दशकांपासून विदेशी नागरिकांच्या घुसखोरीचा मुद्दा गाजत आहे. बंगाल, आसाम आणि ईशान्यपूर्व राज्यांमध्ये नेहमीच बांगलादेशी आणि म्यानमारमधून होणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा चर्चेत असतो. परंतु आता भारतात घुसखोरी करून बेकायदेशीरित्या राहणाऱ्या विदेशी नागरिकांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं केंद्र सरकार या प्रकरणात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
भारतात घुसण्यासाठी अनेक विदेशी नागरिक बनावट पासपोर्टचा वापर करत आहेत. याशिवाय काही विदेशी नागरिक असेही आहेत की जे भारतात आल्यानंतर त्यांचं पासपोर्ट फाडून टाकतात. त्यामुळं त्यांचं मायदेशी परतणं कठीण होऊन जातं. २०१९ ते २०२१ या काळात महाराष्ट्रात एकूण १८२ विदेशी नागरिकांवर बेकायदेशीररित्या भारतात राहिल्याच्या कारणावरून भारतीय पासपोर्ट कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बनावट पासपोर्ट बनवून भारतात आल्याचा आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
महाराष्ट्रात १८२ विदेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत आहेत. त्यानंतर त्रिपुरा (१२२), तामिळनाडू (४६), पश्चिम बंगाल (१७) आणि कर्नाटक (१४) या राज्यांमध्येही विदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याची प्रकरणं समोर आलेली आहे. त्यामुळं आता नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनं जाहीर केलेल्या रिपोर्टनंतर देशात विदेशी नागरिकांच्या घुसखोरीवरून पुन्हा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.