खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? यावर शिंदे-ठाकरे गटात संघर्ष सुरूच आहे. परंतु अंधेरी पोट निवडणूक लढवण्यासाठी, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल तलवार’ चिन्ह दिलं असून ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिलं आहे. तर ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देऊन ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिलं आहे.
आता दोन्ही गटाला हे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. यावर चंद्रकांत खैरे म्हणाले की, ही मशाल मार्ग दाखवणारी आहे. आमच्या पक्षाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्हाला मशाला चिन्ह मिळताच ती अवघ्या पाच मिनिटात घराघरात पोहचली.
तसेच त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीकाही केली. ते म्हणाले, त्यांच्या चिन्हात दोन तलवारी आहेत, एक मुख्यमंत्र्यांकडं राहील आणि दुसरी उपमुख्यमंत्र्यांकडं राहील. जर पुढं काही झालं तर शिंदे लढाई करतील आणि फडणवीस ढाल- तलवार पकडतील.
दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी अंधेरी पोट निवडणूक जिंकण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.