पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथिल श्री महाकाल लोक येथे महाकाल लोक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. पहिल्या टप्प्यातील महाकाल लोक प्रकल्प कार्यामुळे मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना जागतिक दर्जाच्या सुविधांचा अनुभव घेता येणार असुन त्यांची यात्रा अधिक समृध्द होईल. मंदिराच्या संपूर्ण परिसरातील गर्दी कमी करणे तसेच या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या वारसा संरचनांचे जतन तसेच जीर्णोद्धार करण्यावर विशेष भर देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाअंतर्गत मंदिराच्या सीमांचा सात पटीने विस्तार होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या कामाला सुमारे 850 कोटी रुपये खर्च येणार आहे. सद्यस्थितीला या मंदिरात दर वर्षी सुमारे दीड कोटी भाविक भेट देतात. प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यावर ही संख्या दुप्पट होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाचे विकासकार्य दोन टप्प्यांमध्ये नियोजित करण्यात आले आहे.
महाकाल पथ या ठिकाणी 108 स्तंभ असून त्यावर भगवान शिवाच्या आनंद तांडव स्वरूपातील नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत.महाकाल पथाच्या आजूबाजूला भगवान शंकर यांच्या जीवनाचे दर्शन घडविणाऱ्या विविध धार्मिक शिल्पांची उभारणी करण्यात आली आहे. या मार्गालगत उभारलेल्या भिंतीवर विश्वाची निर्मिती, गणेश जन्म, सती आणि दक्षा यांच्या कहाण्या इत्यादी शिव पुराणातील कथा सांगणारी भित्तीचित्रे आहेत. अडीच हेक्टरवर पसरलेल्या या संकुलाच्या चहुबाजूंना कमळे असलेले तलाव आहेत आणि त्या तलावात भगवान शंकराच्या शिल्पासह कारंजी देखील बसविण्यात आली आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान तसेच सर्व्हिलन्स कॅमेरांच्या मदतीने एकात्मिक आदेश तसेच नियंत्रण केंद्रांद्वारे या संपूर्ण परिसरावर अहोरात्र लक्ष ठेवण्यात येणार आहे.