पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत हे ईडी कोठडीत होते. आता त्यांना न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यात येणार आहे. न्यायालयीन कोठडीत दाखल होण्यापूर्वी राऊतांनी त्यांच्या आईला भानविक पत्र लिहिलं आहे.
या पत्रातून त्यांनी भावनिक होत, आपण कायम उद्धव ठाकरेंसोबत आहे, असं म्हटलं आहे. पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, सगळ्यांना माहित आहे की, माझ्यावर बनावट आणि खोटे आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी गन पाॅईंट वर माझ्याविरूद्ध बोगस स्टेटमेंट घेतले जात आहेत.
पुढं त्यांनी असंही म्हटलं आहे की, अप्रत्यक्षपणे ठाकरेंची साथ सोडा असं सुचवलं जात आहे, याच प्रकारचा जुलूम टिळक सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले, प्राण गमावले.
मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा ? का झुकावे ? उद्धव ठाकरे हे माझे जीवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू, असंही राऊत या पत्रात म्हणाले आहेत.