Tuesday, July 23, 2024

मुलीचा दुपट्टा ओढणे, चुकीच्या हेतूने तिचा हात पकडणे पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा: मुंबई विशेष न्यायालय

देशमुलीचा दुपट्टा ओढणे, चुकीच्या हेतूने तिचा हात पकडणे पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा: मुंबई विशेष न्यायालय

अल्पवयीन मुलीचा दुपट्टा ओढून वाईट हेतूने तिचा हात पकडल्याप्रकरणी मुंबई विशेष न्यायालयाने 23 वर्षीय तरुणाला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासंबंधी न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, यामुळे पीडिता, तिचे कुटुंब आणि समाजावर बरेच विपरीत परिणाम होत आहेत, त्यांना असे वाटते की घर आणि आजूबाजूचा परिसर मुलांसाठी सुरक्षित नाही.

यासंदर्भात न्यायालयाने म्हटले, “नक्कीच अशी घटना लोकांच्या मनात, पीडित मुलीच्या आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या मनात भीती निर्माण करते आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो.”विशेष न्यायाधीश प्रिया बनकर यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि 506 तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO), 2012 च्या कलम 8 (लैंगिक अत्याचाराची शिक्षा) अंतर्गत आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने पीडित मुलीला नुकसानभरपाई म्हणून आरोपीला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

CRPC च्या कलम 357(1) अंतर्गत हा खटला दाखल झाला होता हा गुन्हा व खटला 2017-18 मध्ये दाखल झाला होता. पीडितेच्या तक्रारी नुसार जेव्हा अल्पवयीन मुलगी घरातील सामान घेऊन येण्यासाठी बाहेर आली होती त्यावेळेस आरोपीने पीडितेचा दुपट्टा ओढला आणि तिचा हात धरला. पीडितेने आरडाओरड केल्यावर व ही घटना वडिलांना सांगणार असल्याचे म्हणल्यावर आरोपीने तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी माहीम पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

खटल्याच्या वेळीही पीडितेने साक्ष दिली की, आरोपी तिच्या घरासमोर उभा राहून तिचा पाठलाग करत असे. हा प्रकार पीडितेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीचा पाठलाग केला मात्र पोलिसात तक्रार नोंदवली नाही. या खटल्यात आरोपीचा बचाव असा होता की, त्याचे आणि पीडितेचे प्रेमसंबंध होते. परंतु घटनेच्या वेळी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने न्यायालयाने हा बचाव स्वीकारण्यास नकार दिला.

न्यायालयाने म्हंटले की,आरोपीने घरात घुसून पीडितेच्या वडिलांना मारहाण करण्याची धमकी दिल्याचे पुराव्यावरून दिसून येते आहे. फिर्यादीने IPC च्या कलम 506 अंतर्गत गुन्हा सिद्ध केला आहे. तसेच आरोपीने भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि 506 अंतर्गत दंडनीय आणि POCSO कायद्याच्या कलम 7 नुसार, कलम 8 नुसार शिक्षापात्र गुन्हा केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी फिर्यादीने पुरेसे पुरावे सादर केले आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles