अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांच निधन झाल्यानं तिथे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु ऋतुजा या मुंबई महानगरपालिकेत लिपीक म्हणून काम करत असल्यानं त्यांना राजीनामा दिल्याशिवाय ही निवडणूक लढवता येणार नव्हती.
ऋतुजा यांनी राजीनामा देऊनही महापालिकेने नियमाचं कारण देऊन राजीनामा स्विकारण्यास विलंब लावला. म्हणून ऋतुजा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर गुरूवारी सुनावणी पार पडली आहे.
न्यायालयाने ऋतुजा यांना दिलासा दिला आहे. शुक्रवारी 11 वाजेपर्यंत राजीनामा स्विकारल्याच पत्र द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिला आहे. त्यामुळं ऋतुजा यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, शिंदेंच्या बंडानंतर शिंदे-ठाकरे या दोन्ही गटासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. त्यामुळं या निवडणुकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.