Monday, June 5, 2023

दिवाळीच्या तोंडावर अकोल्यात FDA ची मोठी कारवाई; बनावट मिठाई जप्त

maharashtraदिवाळीच्या तोंडावर अकोल्यात FDA ची मोठी कारवाई; बनावट मिठाई जप्त

अकोला : दिवाळीच्या दिवसांमध्ये मिठाईंची विक्री मोठ्या प्रमाणात होते. यामुळेच या मिठाईत बनावट पदार्थ मिसळण्याची शक्यताही असते. अशातच दिवाळी सुरू होण्याआधीच अकोला अन्न व औषधे प्रशासन दक्ष झाले असून प्रशासनाने 14 ऑक्टोबर शुक्रवारी दोन विविध ठिकाणी कारवाई करून 486 किलो 1 लाख 6 हजार सहाशे रुपयाची मिठाई जप्त केली आहे.

दिवाळीच्या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने त्याचा गैरफायदा घेत व्यापाऱ्यांकडून भेसळयुक्त व बनावट मिठाई ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असतो. बाजारात असलेली मिठाई शुद्ध खव्यापासूनच बनवलेली असेल याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घेत सज्ज झाले असून अकोला शहरात दोन विविध ठिकाणी छापे मारून लखोंचा मिठाईचा साठा जप्त केला. अकोला शहरात बाहेरील राज्य तसेच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात बनावट मिठाई खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून शहरात येणार असल्याची माहिती अकोला अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे 14 ऑक्टोबरला अकोला निमवाडी स्टॅन्ड येथे अनिकेत प्रफुल कुमार सेठ राहणार कामरगाव, ता. कारंजालाड जि. वाशिम यांच्या ताब्यातून इंडियन स्वीट विकास बँड चा नमुना घेऊन उर्वरित साठा 298 किलो ज्याची किंमत 59 हजार 600 रुपये आहे, असा मिठाईचा माल जप्त करण्यात आला. सदर अन्नपदार्थाच्या पॅकेटवर लॉट नंबर, उत्पादन तिथी व व्हेज सिम्बॉल नमूद नसल्याने सदर साठा जप्त करण्यात आला.

तर दुसऱ्या कारवाईत हरिहर पेठ अकोला येथील शुभम रामसरन पांडे यांच्या मालकीचे सौम्य गृह उद्योग या पेढीतून स्पेशल बर्फी श्रीकृष्ण ब्रँड या अन्न पदार्थाचा नमुना घेऊन उर्वरित साठा 188 किलो ज्याची किंमत 47 हजार रुपये आहे असा माल जप्त करण्यात आला आहे. या अन्नपदार्थाच्या पॅकेटवरदेखील कोणत्याच प्रकारचे लॉट नंबर, उत्पादन तिथी व व्हेज सिम्बॉल नमूद नसल्याने हा साठा जप्त करण्यात आला असून दोन्ही कारवाईत अन्न व औषधे प्रशासनाने एकूण 486 किलो मिठाईचा 1 लाख 6 हजार सहाशे रुपयाची साठा जप्त केला आहे. या दोन्ही कारवाया अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे, नमुना सहायक पांडे यांनी सह आयुक्त, अमरावती श्री कोलते साहेब व सहाय्यक आयुक्त, अकोला श्री तेरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बनावट मिठाईवर अकोला अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केल्याने नागरिक सतर्क झाले आहेत तर मिठाई दुकानदार चांगलेच धास्तावले आहेत.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles