ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिंदे फडणवीस सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारला इशारा पत्रे लिहिणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारकडे लोकायुक्त कायद्यासंबंधी मागणी केली आहे.
अण्णा हजारे यांनी इशारा न देता केवळ आवाहन केले आहे. लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार असून तो आगामी अधिवेशनात मांडावा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.
दरम्यान, लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून मसुदा समितीच्या बैठका झाल्या. आता या कायद्याचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. तो राज्य सरकारकडे सादरही केला आहे. आता त्याचे कायद्यात रूपांतर होणे गरजेचे असून त्यासाठी तो अधिवेशनात मांडावा, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.
दरम्यान, अण्णा हजारे यांनी लोकायुक्ताच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारला देखील आंदोलनाचा इशारा दिला होता. एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा असा इशारा अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला दिलेला. आता या मुद्द्यावरून अण्णा पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.