निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत सीईसी राजीव कुमार यांनी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे या पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, 8 जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशातील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसेच 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असुन हिमाचल प्रदेशातील निवडणुका एकाच टप्प्यात पूर्ण होतील. निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना ते म्हणाले की, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर असेल, तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर असेल.
सीईसी राजीव कुमार पत्रकार परिषदच्या सुरुवातीला म्हणाले की ऑक्टोबर हा सणांचा महिना आहे आणि त्यात आम्ही हा लोकशाहीचा सण जोडत आहोत. तसेच आम्ही निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी कटिबद्ध आहोत. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, असा आमचा प्रयत्न आहे. नावनोंदणीच्या दिवसापर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेऊन निवडणुका घेतल्या जातील, असे ते म्हणाले. तसेच काही मतदान केंद्रांची कमान महिलांच्या हाती राहणार आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले.