भारताने आण्विक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे भारतासाठी एक मोठे पाऊल आहे. संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे की, भारताने आण्विक पाणबुडी INS अरिहंतवरुन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, अनेक देशांकडून बॅलेस्टिक आणि आण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी योग्य तयारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताचे हे पाऊल फार महत्त्वाचे आहे.
INS अरिहंत भारतीय नौदलातील एकमेव न्यूक्लिअर बॅलेस्टिक सबमरीन म्हणजे आण्विक पाणबुडी आहे. 2009 मध्ये या पाणबुडीला लाॅच करण्यात आले होते. त्यानंतर नौदलाने या पाणबुडीला 2016 साली कोणताही गाजावाजा न करता नौदलात सामील करुन घेतले. INS अरिहंत लाॅंच करण्यात आली तेव्हा या पाणबुडीचा फोटो समोर आला होता. मात्र, त्यानंतर याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शुक्रवारी झालेल्या क्षेपणास्त्र चाचणीचे फोटो किंवा व्हिडीओ लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील.
INS अरिहंत व्यतिरिक्त भारत आता दुसरी आण्विक पाणबुडी INS अरिघाटावरदेखील काम सुरु आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. INS अरिहंतपूर्वी, भारताकडे दुसरी आण्विक पाणबुडी INS चक्र होती, जी रशियाकडून 10 वर्षांसाठी भाड्याने घेतली गेली होती. ती अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी होती, पण या पाणबुडीवरुन आण्विक- बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागता आले नाही.