केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना, नितिश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे जयप्रकाश नारायण यांच्या विचारांना विसरले आहेत, असा आरोप केला होता. या आरोपांना शनिवारी पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांनी उत्तर दिलं आहे.
यादव म्हणाले की, शहा जे काही बोलले ते निरर्थक आहे. भाजपचा जयप्रकाश नारायण यांच्या विचारांशी काही घेणं देणं नाही. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्तानं ‘सितारा-दियारा’ कार्यक्रमाचं आयोजन केलं, यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीविषयी बोलायला हवं होतं.
तसेच यादव यांनी देशात लोकशाहीच्या नावावर हुकूमशाही सुरू असल्याचा आरोपही भाजपवर केला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील हे सरकार हुकूमशाही सरकार आहे. लोकशाही कुठं आहे ?, असंही यादव म्हणालेत.
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलात कोणत्याही प्रकारचे मतभेद करत नसल्याचं यादव यांनी सांगितलं आहे. आता यादव यांच्या या वक्तव्याला भाजप काय उत्तर देईन हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.