घर आणि व्यावसायिक गाळ्यांच्या बांधकामाचे आश्वासन देत सामान्य ग्राहकांकडून पैसे घेत त्यांची फसवणूक करणा-या आणि देशातील प्रमुख शहरांत बांधकाम उद्योगात कार्यरत असलेल्या आयरो समूहाची तब्बल 1 हजार 317 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या या मालमत्तेमध्ये भूखंड, व्यावसायिक जागा, घरे आणि बॅंक खात्यातील रक्कम आदींचा समावेश आहे. शाओमी कंपनीवर ईडीने तीन महिन्यांपूर्वी जप्तीची कारवाई करत कंपनीची 5 हजार 500 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीसह देशातील अन्य काही प्रमुख शहरांत ललित गोएल यांची आयरो कंपनी बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील काही प्रमुख शहरांतून नवे बांधकाम प्रकल्प कंपनीने सादर केले. या माध्यमातून ग्राहकांना घर, तसेच व्यावसायिक गाळे देण्याचे आश्वासन कंपनीने दिले. मात्र, प्रत्यक्षात या प्रकल्पाकरता ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करुनही कंपनीने त्या ग्राहकांना घरे अथवा व्यावसायिक गाळे दिले नाहीत.
कंपनीच्या संचालकांनी या पैशांचा अपहार केल्याचे लक्षात आल्यानंतर दिल्ली, गुरगाव, पंचकुला, लुधियाना आदि शहरांतून कंपनीच्या विरोधात तब्बल 30 एफआयआर दाखल झाल्या. या आर्थिक गैरव्यवहारांची व्याप्ती लक्षात घेता, हा तपास ईडीने देखील सुरु केला होता. तसेच, कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष असेलल्या ललित गोएल याला 16 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती.