भारतातील वाढत्या अंमली पदार्थांच्या नेटवर्कवर मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापेमारी केली आहे. देशातील पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली- एनसीआर सहित 40 ठिकाणी एनआयएने धाडी टाकल्या आहेत.
एनआयएने मंगळवारी दहशतवादी आणि ड्रग्ज तस्कर यांच्यातील संबंधाविरोधात मोठी कारवाई केली. एनआयएने दहशतवादी संबंधांबाबत देशभरातील अनेक गुंडांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली-एनसीआर प्रदेशात दहशतवादी, गुंड आणि अंमली पदार्थांचे तस्कर यांच्यातील संबंध तोडण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी परदेशातून दहशतवाद्यांना पैसे पुरवले जात आहेत. सुरक्षा यंत्रणांची नजर या नेटवर्कवर विशेष आहे. गेल्या आठवड्यात एनआयएने जम्मू- काश्मीरमधील शोपियान आणि राजौरी जिल्ह्यात छापे टाकले होते.
दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील 40 हून अधिक वेगवेगळ्या ठिकाणी मंगळवारी एनआयएने छापे टाकले आहेत. या कारवाईत पथकांचा सहभाग आहे. बहुतेक छापे हरियाणा, उत्तराखंड आणि पंजाबमधील आहेत. दिल्लीत लाल बवाना परिसरात नीरज बवाना यांच्या अड्ड्यावर धाड टाकण्यात आली आहे. आतापर्यंतच्या छाप्यांमध्ये अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांनी यापूर्वी यूएपीए अंतर्गत 2 गुन्हे दाखल केले होते, त्याच प्रकरणांची दखल घेत एनआयएने कारवाई केली आहे. परदेशात आणि भारतातील वेगवेगळ्या तुरुंगात बंद असलेले गुंड हे विविध स्तरावर आपले नेटवर्क चालवत असून सातत्याने गुन्हे करत असल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वी 12 सप्टेंबर रोजी एनआयएने पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली-एनसीआरमधील 50 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते. आता एनआयएने तपास स्वत:च्या हातात घेऊन छापेमारी सुरू केली आहे.