शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार आलं. यानंतर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला आहे. मात्र भाजप आणि शिंदे गट विरुद्ध महाविकासआघाडी असा विचार केला तर महाविकासआघाडीला जास्त जागा मिळाल्यात.
नाशिकमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला जबर धक्का बसलाय. नाशिकच्या पेठ तालुक्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
पेठ तालुक्यामध्ये एकूण 71 ग्रामपंचायती आहेत, यातल्या 69 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या तर दोन ठिकाणचे निकाल बिनविरोध लागले.
तालुक्यात 29 ग्रामपंचायतींवर अपक्ष, 23 ठिकाणी राष्ट्रवादी, 17 ठिकाणी शिवसेना ठाकरे गट, 1 ठिकाणी काँग्रेस आणि एका ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय झाला.
रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची जादू पाहायला मिळाली. एकूण 24 ग्रामपंचायतींमध्ये उद्धव ठाकरे गटाची सत्ता आली आहे. तर शिंदे गटाला फक्त 7 ग्रांमपंतायतींमध्ये यश आलं आहे. राष्ट्रवादीला या निवडणुकीत 98 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. राष्ट्रवादीचे नेते नेते प्रफुल पटेल यांना धक्का बसला आहे. गोंदियात राष्ट्रवादीला एकाही ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आलेलं नाही. त्यामुळे गोंदियात त्यांचा सुपडा साफ झाल्याचं दिसून आलं. पाचपैकी चार ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी काँग्रेसने यश मिळवलं आहे.
महाड तालुक्यात शिंदे गटाचे पक्ष प्रतोद असलेल्या आमदार भरत गोगावले यांना महाविकास आघाडीने धक्का दिला. काळीज खरवली अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरपंच निवडून आले. दहा सदस्य निवडून येऊनही गोगावले यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पोलादपूर तालुक्यामधील तीन ग्रामपंचायती मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाने जिंकल्या. तर चौथी ग्रामपंचात मनसे प्रणित आघाडीने ताब्यात घेतली.
राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे आणि शिंदे गट यांनी किती यश मिळतंय? याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं.
अखेर रविवारी झालेल्या निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. यात शिवसेना ठाकरे गटाला 87 जागांवर यश मिळालं आहे. तर शिंदे गटाच्या ताब्यात 81 ग्रामपंचायती आल्यात. दोन्ही गटामध्ये 6 ग्रामपंचायतीचा फरक आहे. हा फरक मोठा मानला जातोय. आगामी जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निकालाला राजकीय वर्तुळात महत्त्व दिलं जातय. या निकालाचा आगामी काळात काय परिणाम होतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.