भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने काढलेलला एका आदेश सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा आहे. विखे यांची परवानगी घेतल्याशिवाय पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन न करणेबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा प्रकारचा हा आदेश असून त्यावर नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची सही आहे. या आदेशामुळे आता जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना विचारल्याशिवाय कोणताच सरकारी कार्यक्रम होणार नाही, असे अधोरेखित झाले आहे. मात्र यामुळे नगर जिल्ह्यात लोकशाही आहे का हुकूमशाही? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. नगर व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राज्याचे महसूल मंत्री यांच्याकडे देण्यात आलेले आहे. विखे यांनी नगरमध्ये दोन बैठका या अगोदर घेतलेल्या आहेत, तर सोलापूर येथे सुद्धा त्यांनी जिल्हा नियोजनाची बैठक घेतलेली आहे. या बैठकीत विखे यांनी प्रशासनावर स्वतः चे नियंत्रण राहावे, यासाठी एक नियमावली तयार करण्यास तर सांगितली नाही ना? असा प्रश्न व्हायरल झालेल्या आदेशावरून निर्माण झालाय.
कारण या आदेशात म्हंटले आहे की, ‘जिल्हयात शासकीय कार्यक्रम समारंभ असेल त्या वेळी पालकमंत्र्यांनाही सदर कार्यक्रमास आमंत्रित करावे. तसेच सदर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्री यांचे नाव योग्य प्रकारे छापण्यात यावे, व समारंभांचे वेळी त्यांना आदराचे स्थान देवून त्यांची व्यासपिठावरील बैठक व्यवस्था राजशिष्टाचाराप्रमाणे करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व केंद्रीय मंत्री, राज्यातील अहमदनगर जिल्हयातील सर्व मंत्री यांनाही योग्य ती पूर्वसूचना देवून आमंत्रित करण्यात यावे. त्यांना विश्वासात घेवून ते कार्यक्रमास उपस्थित राहणार किंवा कसे, याची खातरजमा करून समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव योग्य प्रकारे छापण्यात यावे, असेही नमुद आहे. तरी मंत्री, महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नगर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये नगर जिल्हयात शासकीय कार्यक्रम अथवा समारंभ असेल त्या कार्यक्रमास शासकीय निधीतून होणाऱ्या कामांचे भूमीपूजन उद्घाटन यांचे आयोजन करण्यापूर्वी पालकमंत्रीची पूर्व परवानगी घेणेबाबत निर्देश दिले आहेत.
तेव्हा आपणास यादवारे सूचित करण्यात येत आहे की, आपल्या विभागातील कोणाताही शासकीय कार्यक्रम घेण्यापूर्वी पालकमंत्री कार्यालयाकडून पूर्वपरवानगी घेण्यात यावी तद्नंतरच कार्यक्रमाचे नियोजन करावे. अन्य कोणत्याही पदाधिकारी यांनी पूर्वपरवानगीशिवाय कार्यक्रमाचे आयोजन न करणेबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे दिलेल्या आदेशामध्ये नमुद आहे.
दरम्यान, हा आदेश सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.