Wednesday, May 22, 2024

मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणार : चंद्रकांतदादा पाटील

maharashtraमराठा समाजातील व्यक्तींना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणार : चंद्रकांतदादा पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून 10 हजार रुपये बिनव्याजी कर्ज प्रतीदिन रु. 10 प्रमाणे परतफेडीच्या अटीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे अशी माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची दुसरी बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले की, मराठा समाजातील बेरोजगार होतकरू व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी 10 हजार रुपये एक रक्कमी कर्ज बिनव्याजी उपलब्ध करुन देण्यात येईल. या कर्जाच्या परताव्यापोटी त्यांनी प्रती दिन 10 रुपये अशा पद्धतीने परतफेड करावी. या कर्जाची मुदतीत परतफेड केल्यानंतर तो पुन्हा अशाच पद्धतीने 50 हजार रुपये इतक्या रक्कमेचे कर्ज घेण्यास पात्र ठरेल. या 50 हजार रुपयांच्या परताव्यापोटी त्यांना प्रती दिन 50 रुपये असा परतावा राहील. हे कर्ज मुदतीत परतफेड केल्यानंतर त्याच धर्तीवर पुन्हा 1 लाखाचे कर्ज प्रतिदिन 100 रुपये परतावा या प्रमाणे दिले जाईल. अशा जवळपास 10 हजार घटकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी यापूर्वी वयोमर्यादा 45 वर्ष होती ती वाढवून आता 60 वर्ष अशी करण्याचाही निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

तसेच सारथी संस्था पूर्ण ताकदीने राज्यात कार्यान्वित करण्यासाठी सारथीचे विभागीय कार्यालय किंवा उपकेंद्र नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे, लातूर, कोकण विभाग, कोल्हापूर येथे तातडीने सुरु करावी. यासाठी भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करुन घ्यावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.यावेळी ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, आमदार भरत गोगावले, योगेश कदम, प्रवीण दरेकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील, नियोजन विभागाचे प्रधान सचिव डॉ.नितीन गद्रे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे उपस्थित होते.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles