दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये एका मुलीसोबत निर्भयासारखी क्रूर घटना घडली आहे. गाझियाबादच्या नंदग्राम येथे राहणाऱ्या पाच जणांनी स्कॉर्पिओ कारमधून दिल्लीतील या तरुणीचे अपहरण केले होते. यानंतर चालत्या कारमध्ये पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाही तर मुलीला बेदम मारहाण केली.
ती मुलगी मेली आहे असे समजून आरोपीने तिला रस्त्यावर फेकून दिले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील तरुणी रात्री गाझियाबादहून परतत होती. यादरम्यान स्कॉर्पिओ मधुन आलेल्या पाच जणांनी मुलीचे अपहरण केले. यानंतर आरोपीने मुलीवर सामूहिक बलात्कार तर केलाच शिवाय तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉडही टाकला.
त्यानंतर पाच जणांनी मुलीला बेदम मारहाण केली. मुलगी मृत झाल्याचे समजताच आरोपींनी तिला गोणीत टाकून रस्त्याच्या कडेला फेकून दिले व तिथून पळ काढला. पीडित मुलगी आश्रम रोडजवळ गंभीर अवस्थेत सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर तिला गंभीर अवस्थेत दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून, ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.