मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर आले. शिवसेनेतील बंडानंतर हे तिन्ही बडे नेते पहिल्यांदाच वानखेडे मैदानावरील गरवारे क्लबमध्ये एकत्र पाहायला मिळाले.
कार्यक्रम अराजकीय असला तरी या तिन्ही नेत्यांनी तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही शाब्दिक चौकार, षटकार मारत नामोल्लेख टाळत उद्धव ठाकरेंनाही अप्रत्यक्ष टोला लगावला.
मी आणि फडणवीस एकत्र आहोत. आम्हाला थोडी थोडी बॅटींग येते. तीन महिन्यांपूर्वी आम्ही थोडी बॅटींग केली पण शरद पवारांना संधी मिळाली तर कॅचही घेतात, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आणि एकच हशा पिकला.
दरम्यान, आम्ही सर्वांच्या आशीर्वादानेच ही मॅच जिंकली असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले. शिंदेंप्रमाणे फडणवीस आणि शरद पवारांनीही या मंचावर तुफान फटकेबाजी केली.