अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. मात्र, बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नवनीत राणांविरोधात बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर नवनीत राणांनीही यासा आव्हान देणारी याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल केली होती.
मुंबई सत्र न्यायालयानेही या वॉरंटला स्थगिती न दिल्याने नवनीत राणा आता पुरत्या अडचणीत सापडल्या आहेत. सत्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवडी न्यायालयानेही पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, नवनीत राणांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाची पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता नवनीत राणांना खरंच अटक होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.