यावर्षी परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच हाहाकार माजवला आहे. वर्षभर पावसाची आतुरतेने वाट पाहणारा बळीराजा आता मात्र स्वत:च्या डोळ्यांदेखत सगळ्या पिकाचं नुकसान झाल्याचं पाहतो आहे.
दिवाळी तोंडावर आलेली असताना काढणीला आलेला कापूस, सोयाबीन यासोबतच अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळावी यासाठी अनेक नेतेमंडळी मागणी करत आहेत. मात्र शेतकरी अजूनही सरकारकडून काही मदत मिळणार का? याच प्रतिक्षेत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहीलं आहे. त्यामध्ये सध्याची परिस्थिती पाहीली तर लक्षात येईल की राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. सर्वांप्रमाणेच शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार. अशावेळी राज्यसरकारने शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं आहे त्याचा युद्धपातळीवर आढावा घ्यावा आणि शेतकरी बांधवांनी दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी केलेली मागणी राज्य सरकार विचारात घेणार का? जर मागणी लक्षात घेतली तर, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करण्यात येणार याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागलंय.