मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटातील अनेक आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. अगदी ठाकरे कुटुंबातीलही अनेकजण शिंदे गटात गेले. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
पाटील म्हणाले, पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच अलबेल दिसत नाही. जे लोक शिंदे गटात गेले, ते काहीतरी ठरवून गेले, काहीतरी लाभ घेण्यासाठी गेले. आता जनतेच्याही लक्षात आलं आहे की, काही आमदार पश्चाताप करत असून, पूनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळं पुढच्या काळात वेगळं चित्र असेल, असंही जयंत पाटील म्हणाले.
मराठवाड्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पुण्याताही पावसामुळं मोठी हानी झाली आहे. त्यामुळं सरकारनं या जनतेला मदत करायला हवी. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्ली सांभळण्यात दिवस जात आहेत, असा हल्लाबोलही पाटलांनी सरकारवर केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना नामोहरम करणं आणि अडचणीत आणणं, असा उद्योग काहीजण करत आहेत. त्यांना घाबरवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते दबावाला बळी पडूू शकत नाहीत, असंही पाटील म्हणाले.