ईडीने चायनिज लोन अॅप संबंधित पेमेंट गेटवे असलेल्या रेजरपे आणि इतर कंपन्यावर छापेमारी करत 78 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे. या कंपन्यांचे व्यवस्थापन चीनी नागरिकांकडून केले जात असल्याचे ईडीने म्हटले आहे. चायनिज लोन अॅप प्रकरणी बंगळुरू पोलिसांच्या सायबर सेलमध्ये अनेक संस्था आणि लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईडीने शुक्रवारी बंगळुरूमधील पाच ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती आहे. ईडीने या प्रकरणी ज्या कंपन्यांवर छापेमारी केली आहे, त्या कंपन्यांचे व्यवस्थापन चीनी नागरिकांकडून केले जात असून त्यामध्ये अनेक प्रकारची आर्थिक अफरातफर केली जात असल्याचे समोर आले आहे. बोगस कागदपत्रांच्या आणि आयडी खात्यांच्या माध्यमातून ही अफरातफर केली जात आहे असे ईडीने म्हटले आहे. ईडीने ही कारवाई मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये केली आहे. ईडीने बंगळुरूतील पाच परिसरांमध्ये यासंबंधी छापेमारी केली. यावेळी विविध मर्चंट आयडी आणि बँक खात्यांमध्ये असलेली 78 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत 95 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. चायनिज लोन अॅपच्या माध्यमातून चीनी कंपन्यांकडून भारतीयांचा डेटा चोरी होत असल्याचे समोर आले आहे.