राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या उन्नतीकरिता, आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटी रुपयांची तरतूद सन 2022-2023 मध्ये केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नंदुरबार येथे केले. नंदुरबार नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आदिवासी समाजासाठी अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद केली आहे. राज्यातील विकास कामांना गती व चालना देण्याचे काम हे सरकार करीत असून हे सरकार आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गत चार महिन्यात 400 पेक्षा अधिक शासन निर्णय काढले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी राज्यात मोठे उद्योगधंदे येण्याकरिता शासन प्रयत्नशील आहे. नंदुरबार शहरातील रस्ते,पथदिवे,पाणीपुरवठा तसेच विविध विकासकामांसाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच नवापूरमधील 132 के.व्ही विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. नंदुरबार नगर परिषदेची नूतन इमारत अतिशय सुंदर आणि सुसज्ज असून नागरिकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. हिना गावीत, खासदार राजेंद्र गावीत आदी उपस्थित होते.