शिंदेंच्या बंडानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गटासाठी महत्वाची मानली जात आहे. परंतु आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.
राज्यातील सरकारने मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी करण्याची विनंती कॅगकडं (सरकारी कामांची परीक्षण करणारी केंद्र सरकारची सर्वोच्च यंत्रणा) केली होती. ही विनंती आता कॅगनं मान्य केली आहे. यानुसार आता मुंंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या कामांची चौकशी होणार आहे. या कामांमध्ये जमीन खरेदी प्रकल्प, रस्ते बांधणी, कोरोना केंद्रांची उभारणी अशा अनेक महत्वांच्या कामांचा समावेश आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या 76 कामांच ऑडिट करण्याची राज्य सरकारची विनंतीही कॅगनं मान्य केली आहे. कॅगकडून चौकशीही सुरू झाली आहे. त्यामुळं मुंबई महापालिका निवडणुका काही दिवसांवर आल्या असता, ठाकरे गटासाठी हा मोठा झटका आहे.
दरम्यान, केंद्रामध्ये आणि राज्यातही भाजपची सत्ता असल्यानं या भाजपच्या मागणीला मान्यता मिळाली, अशा चर्चाही रंगल्या आहेत. तसेच कॅगचा अहवाल काय येईल,याकडंही सर्वांचं लक्ष लागलं आहे.