राज्यातील विरोधी पक्षांनी सरकार विरुद्धच्या आवाजाची धार चांगलीच तीव्र केली असून राज्याबाहेर जात असलेल्या गुंतवणुकी विरोधात रोज नवीन आरोप विरोधी नेते करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाला उत्तर देण्यासाठी पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेना यांची युवा विंग चांगलीच आक्रमक झाली असून पुण्यात त्यांनी या विरोधात फ्लेक्स बाजी सुरु केली आहे
पुण्यातील फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या या संघटनेच्या युवा सेनेमार्फत ठिकठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून ‘उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा’ असे टॅग लाईन लिहलेले फ्लेक्स लावले आहेत.
त्यावर महाराष्ट्र पूर्वी प्रस्तावित असलेल्या तीन प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आला असून ते प्रकल्प महाराष्ट्रात कधी प्रस्तावित होते हे देखील नमूद करण्यात आले आहे, या फलकावर फॉक्सकॉन-वेदांत, बल्क ड्रग पार्क व टाटा एअर बस या प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला आहे. या फलकांमार्फत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. महाराष्ट्रामधून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत.हे दर्शवण्यात आले असून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे