200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या अटकेत असून सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) याप्रकरणी चौकशी सुरु आहे. दिल्लीच्या मंडोली कारागृहात फसवणूकीच्या आरोपाखाली असलेल्या सुकेश चंद्रशेखरचे एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. या तीन पानी पत्रात सुकेशने बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबतच्या त्याच्या नात्यापासून ते 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याच्या योजनेवर खुलासा केला आहे. तसेच आपच्या बड्या नेत्यावर आरोप केले आहेत.
सुकेश चंद्रशेखने त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत अनेक खुलासे केले आहेत. सुकेश चंद्रशेखरने दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहून आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुकेश चंद्रशेखरने दावा केला आहे की, त्याने सत्येंद्र जैन यांना संरक्षणासाठी 10 कोटी रुपये दिले होते.
सुकेश चंद्रशेखरने 18 ऑक्टोबर रोजी दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहून मोठा खुलासा केला आहे. यानंतर लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी या पत्राच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सुकेश चंद्रशेखरने दावा केला आहे की त्याला अटक करण्यापूर्वी दक्षिण भारतात आम आदमी पार्टी मध्ये मोठे पद देण्यासाठी 50 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. सुकेशने दावा केला की, घोटाळ्याच्या आरोपाखाली तिहारमध्ये असलेले आपचे मंत्री आणि सत्येंद्र जैन यांना भेटण्यासाठी तुरुंगातही आले होते.
पत्रात सुकेश चंद्रशेखरने दावा केला आहे की, 2017 मध्ये जेव्हा मी तिहार तुरुंगात बंद होतो, तेव्हा सत्येंद्र जैन तुरुंगमंत्री होते आणि ते तुरुंगात भेटण्यासाठी अनेकदा आले होते. आम आदमी पार्टीला दिलेल्या पैशांची माहिती मी तपास यंत्रणेसमोर देऊ नये, असे त्यांनी मला सांगितले होते. यानंतर 2019 मध्येही सत्येंद्र जैन सेक्रेटरी आणि मित्र सुशील तुरुंगात आले आणि त्यांनी मला दर महिन्याला प्रोटेक्शन मनी म्हणून 2 कोटी रुपये मागितले, जेणेकरून मी तुरुंगात सुरक्षित राहू शकेन आणि मला तुरुंगात सुविधा मिळू शकतील.
दरम्यान, हे पत्र प्रसारमाध्यमांसाठी म्हणून लिहिले होते. यामध्ये सुकेशने स्वत:ला कायद्याचे पालन करणारा व्यक्ती असल्याचे सांगितले आहे. त्याने जॅकलिनसोबतचे नातेही मान्य केले आहे. कायदेशीररित्या कमावलेल्या रकमेतून जॅकलिन आणि तिच्या कुटुंबीयांना भेटवस्तू दिल्याचे त्याने सांगितले. यासोबतच त्यांने २०२४ मध्ये त्याच्या राज्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा आणि जिंकण्याचा दावाही केला आहे.