सध्या सुरू असलेल्या T20 World Cup मध्ये टीम इंडिया शानदार प्रदर्शन करताना दिसत आहे. भारत लवकरच सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल, असं चित्र आहे. भारतीय फलंदाजांची आक्रमक खेळी आणि गोलंदाजांच्या सुपरफास्ट बॉलिंगमुळे टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आता दिनेश कार्तिक टीम इंडियामधून आऊट झाल्याचं पहायला मिळतंय.
टीम इंडिया वर्ल्ड कप खेळत असतानाच आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कप नंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून सोमवारी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली. त्या संघात दिनेश कार्तिकला स्थान देण्यात आलं नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 टी-20 आणि तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. या दौऱ्यासाठी सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून हार्दिक पंड्या हा टी20 टीमचा कर्णधार असणार आहे. तर वनडे टीमची जबाबदारी शिखर धवनकडे असणार आहे.
वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रित करत आहोत. योग्य वेळी कोणाला विश्रांती द्यायची याचे आम्ही नियोजन करत आहोत, असं सलेक्टर चेतन शर्मा यांनी म्हटलं आहे.
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
दरम्यान, न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनेक दिग्गज खेळाडूंना सुट्टी देण्यात आली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी हे खेळाडू संघाचा भाग असणार नाहीत. मात्र, डीके आणि आश्विनला विश्रांती दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आता टीम इंडियाची यंगिस्तान कसा कमाल दाखवेल हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.