झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात (SRA) सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. आरोपांनंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशीही करण्यात आली. मात्र, दादर पोलिसांना पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आता मंगळवारी किशोरी पेडणेकर चौकशीसाठी दादर पोलीस ठाण्यात हजर झाल्या होत्या. माध्यमांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर यांनी चौकशीबाबत भाष्य केले.
“एका पक्षाच्या माजी खासदाराने हे आरोप केले आहेत. त्यामुळे प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं पाहिजे याची गरज नाही. मला बोलवणं आलं मी तेव्हाच पोलिसांना सांगितले होते मी व्यस्त आहे. पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नाही अशी खोटी बातमी चालवण्यात आली. अडीच चौकशी झाल्याचे म्हटले पण बराच वेळ आमच्या गप्पांमध्येच गेला. त्यानंतर जे प्रश्न विचारले त्यांना मला माहिती असलेली उत्तरे मी दिली आहेत,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
“ज्या पद्धतीने हे प्रकरण रंगवलं जात आहेत त्यातील दहा टक्केही हे खरे नाही. सगळ्या पक्षातील नेते माझ्यासोबत चॅट करु शकतात. मी ते चॅट वाचले का किंवा त्याला माझा रिप्लाय आहे का? प्रत्येक मेसेज वाचला जातो का? मी कुठलाही मेसेज वाचला नाही. त्याने केलेल्या मेसेजला माझ्याकडून काही प्रतिसाद नाही,” असेही किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
एसआरए प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी दादर पोलीस ठाण्यात भेट देत पेडणेकर यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार पेडणेकर यांना पोलिसांनी समन्स बजावलं होतं. या चौकशीसाठी पेडणेकर दुसऱ्यांदा दादर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.