ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांसाठी अत्यंत धोकादायक आजार आहे. जगभरात अनेक महिलांना हा आजार होतोच. मात्र, आताही याबाबत लोकांमध्ये जागृतीचा अभाव कमी दिसतो. त्याचबरोबर, पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक माहिरा खानने ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीबद्दल नुकतंच सांगितलं आहे.
अलीकडेच, इंडिपेंडेंट उर्दूशी संभाषणात, माहिरा खानने ब्रेस्ट कॅन्सरबद्दल तिची मतं मांडली आहेत. ज्यामुळे लोकांना याची जाणीव झाली आहे. यासोबतच त्यांनी हे देखील सांगितलं आहे की, पाकिस्तानमध्ये हा आजार किती वेगाने वाढत आहे.
या संभाषणात माहिरा खान म्हणाली, ”माझ्यासाठी 10 वर्षे झाली आहेत, मी 10 वर्षांपासून ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी काम करत आहे. आणि 10 वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या स्त्रिया आणि मुलींमधला फरक आपल्याला पाहायला मिळतो. आम्हाला फरक पडला आहे, लोकांमध्ये जागरूकता आली आहे, लोक त्याबद्दल बोलू लागले आहेत. पूर्वी लोकांना याबद्दल बोलायला आणि स्तन हा शब्द वापरायला लाज वाटायची.
याविषयी ती पुढे म्हणाली, “स्तन या शब्दात लाज वाटण्यासारखं काही नाही, शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे हा देखील एक शरीराचा अवयव आहे. आणि पाकिस्तानच्या लोकांना हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण पाकिस्तानमधील नऊपैकी एक महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहे, ही एक मोठी संख्या आहे.”
माहिरा पुढे म्हणाली, ”आपल्याला याबद्दल मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. जागरूकता पसरवण्याची गरज आहे. आपल्या घरातील पुरुषांनीही याविषयी मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. कारण समस्या तेव्हा येते जेव्हा महिलांना याविषयी बोलता येत नाही तेव्हा त्यांना वाटतं की, माझा नवरा, माझा भाऊ, माझा मुलगा काय बोलेल. हा एक कर्करोग आहे ज्यावर वेळीच उपचार केल्यास हा आजार टाळता येऊ शकतो.
या संभाषणाच्या शेवटी माहिरा खान म्हणाली की इंटरनेटच्या माध्यमातून आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरूक राहू शकतो आणि मला खात्री आहे की आपण लोकांमध्ये जागृती करू.