भारतीय संघ सध्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये व्यस्त आहे. मात्र या स्पर्धेनंतर भारतीय संघाला बांगलादेश आणि न्यूझीलंडचा दौरा करावा लागणार आहे. भारताला 18 ते 30 नोव्हेंबर दरम्यान न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची टी-20 (T20) आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. तेथून भारतीय संघ बांगलादेशला जाणार आहे. पण या दोन्ही मालिकांमध्ये 22 वर्षीय स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉचे नाव नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही संघात नाव न आल्याने पृथ्वी शॉने नाराजी व्यक्त केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यासाठी अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर ऋषभ पंतला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय निवडकर्त्यांनी बांगलादेशविरुद्धच्या दौऱ्यासाठीही संघ जाहीर केला असून अनेक नव्या चेहऱ्यांना आजमावण्याचा निर्णयही घेतला आहे. संघाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच पृथ्वी शॉने सोशल मीडियावर असे काहीतरी लिहिले की, ज्याची खूप चर्चा होत आहे. मुंबईच्या या फलंदाजाला न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमध्ये स्थान मिळालेले नाही.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारा शॉ एका वर्षाहून अधिक काळ भारतीय संघातून बाहेर आहे. पृथ्वी शॉने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्याला संघाच्या घोषणेसोबत जोडले जात आहे. ‘साईबाबा, मला आशा आहे की तुम्ही सर्व काही पाहत असाल’ असे पृथ्वी शॉने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
पण यादरम्यान, मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी पृथ्वी शॉबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पृथ्वी शॉची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास संपलेली दिसत होती. पण चेतन शर्माचे हे विधान त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाचे आहे. चेतन शर्मा म्हणाले की, “क्रिकेटचे दरवाजे कोणासाठीही बंद होत नाहीत. वय ही फक्त एक संख्या आहे. तुमची कामगिरी चांगली असेल, तर निवडकर्ते अनुभवी खेळाडूंना निवडण्यापेक्षा तुम्हाला निवडतील. निवडकर्ते पृथ्वी शॉच्या सतत संपर्कात आहेत. त्याला त्यांचा हक्क निश्चितच मिळेल.”