महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनासाठी अस्थायी समिती आणि राज्य कुस्तीगीर परिषद दोघेही आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे अधिकृत स्पर्धा कोणाची असा संभ्रम पैलवान आणि कुस्ती शौकिनांमध्ये निर्माण झाला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारणी बरखास्त केली आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारणी बरखास्त केली. तेथे अस्थायी समितीची स्थापना केली. या कारवाईला परिषदेच्या कार्यकारिणीने न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर निर्णय झालेला नाही. असे असताना अस्थायी समितीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा केली. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. ही स्पर्धा १५ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत कोथरूडमध्ये होणार आहे. असे असतानाच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनेही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे ठिकाण आणि वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचे घोषित केले. आहे. त्यामुळे आता कोणाची अधिकृत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असेल यावरून पहिलवान आणि कुस्ती शौकिनांमध्ये संभ्रम आहे. अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय कुमार सिंग यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत शहर आणि जिल्हा तालीम संघानी निवड चाचणी घ्यावी, असे पत्रक काढले आहे. त्यामुळे पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तयारीला वेग आला आहे. असे असतानाच परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र केसरी २०२२-२३ स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे सांगून खळबळ उडवून दिली. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.