सततच्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होते आहे. अवकाळी पावसानं शेतीची परिस्थिती बिघडली आहे. त्याचबरोबर याचा परिणाम अन्नधान्यांवरही होतो आहे. सध्या याचा परिणाम मोठ्या शेतीजन्य परिसरात पाहायला मिळतो आहे. त्यामुळे आता उत्पादन कमी झाल्यामुळे सध्या अन्नधान्यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
सततच्या व लांबलेल्या पावसाने लाल कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या पूर्व भागात कांदा रोपे खराब झाल्याने कांदा लागवड उशीरा झाली तर जो काही कांदा लागवड झाला होता, तो पावसाने खराब झाल्याने दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा लाल कांद्याचा हंगाम यंदा मात्र एक ते दोन महिने लांबणार आहे.
नवा कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत नसल्याने जुन्या आणि साठवणूक ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे. साठवलेला कांदाही दमट वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झाला, परिणामी कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे.