निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर केल्या. गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार असून, 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ते म्हणाले की, “मला कळविण्यात आनंद होत आहे की, गुजरात विधानसभा निवडणुकीत 3,24,422 नवीन मतदार यावेळी प्रथमच मतदान करतील. एकूण मतदान केंद्रांची संख्या 51,782 आहे. राज्यात स्थापन केलेल्या मतदान केंद्रांपैकी , किमान 50% मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था केली जाईल.
मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार म्हणाले की, “यावेळी निवडणूक आयोग एक अनोखा उपक्रम राबवणार आहे, त्यामागील उद्देश हा आहे की, कोणताही मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये. यासाठी 217 मतदारांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच भरुच जिल्ह्यातील अलियाबेट येथे कंटेनरमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार असून याआधी येथील मतदारांना मतदानासाठी 82 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता.
गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होणार असून, त्यात पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. यानंतर हिमाचल प्रदेशसह दोन्ही टप्प्यातील मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत, तिथे ते विविध रॅलीला संबोधित करत आहेत आणि अनेक आश्वासने देत आहेत.
तसेच आम आदमी पार्टी हा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याने निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच 100 हून अधिक उमेदवारांची घोषणा केली आहे. त्याचवेळी लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान यांनीही त्यांच्या पक्ष हिमाचल तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सातत्याने गुजरातचा दौरा केला असून, तेथे त्यांनी अनेक विकासकामांची उद्घाटने आणि पायाभरणी केली आहे. गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होणार असून, त्यात पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. यानंतर हिमाचल प्रदेशसह दोन्ही टप्प्यातील मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे.