विधानसभा आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. यावर जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्या महिलेने आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. ती महिला आधीच जामिनावर आहे. तसेच आव्हाड यांनी कार्यक्रमात ढकलल्यानंतर चार तासाने तुम्हाला ढकलल्याची जाणीव होते काय? असा सवाल करतानाच विनयभंग होतो तर मग गर्दीच्या ठिकाणी जाताच कशाला? असा संतप्त सवाल ऋता आव्हाड यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कालच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी होती. सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता. अशा ठिकाणी कुणी कुणाला बाजूला केलं तरी कुणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या महिलेलाही गर्दीमुळे खांद्याला धरून बाजूला केलं असेल. पण चार तासानंतर आपल्याला बाजूला केलं याची या महिलेला जाणीव कशी झाली? चार तासानंतर गुन्हा दाखल करण्याचं कारण काय? हा काय पोरकटपणा आहे, असा संताप ऋता आव्हाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आव्हाडांनी ट्विट करत राजीनामा देत असल्याचं म्हटलंय. यानंतर आव्हाडांचे समर्थक संतापले आहेत. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत.