कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंबद्दल खालच्या पातळीवर टीका केली होती. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच शिंदे सरकारवर सडकून टीका केला. यावेळी अजित पवार चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांनी अब्दुल सत्तार यांना देखील यावेळी बोलताना सुनावलं.
मी दिवाळीपूर्वीच फडणवीस आणि शिंदे यांची भेट घेतली होती. सध्या तुमच्या पक्षात वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलेलं आहे. बाकीच्या प्रवक्त्यांनी काय बोलावं तो पक्षाचा अधिकार आहे. पण ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील सहकारी बोलत आहेत. त्यातून सरकारची प्रतिमा खराब व्हायला मदत होते, असं अजित पवार म्हणालेत.
दरम्यान, माझी बहीण सुप्रियावर सत्तार बोलले. याला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणायला हवं. सहज बोलायला तुम्ही काही सामान्य नाहीत हे मंत्री पदावर आहात, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे सरकारमधील मंत्र्यांची कानउघडणी केलीये.